उजनी धरणातून उद्यापासून (दि. 1 जुलै) सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहेत. 4500 क्युसेक वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदाचे सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.दरम्यान, गेले दोन दिवस दौंड, नगर, इंदापूर आणि भिगवण परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात दहा हजार क्युसेक्सने पाणी जमा झाले, असेही साळे यांनी सांगितले.



आषाढी वारीसाठी उजनी धरणातून 21 जूनपासून भीमा नदीपात्रात 4500 क्युसेकने पाणी सोडले होते. 26 जूनपासून यामध्ये घट करून ते 1000 क्युसेकने सोडण्यात येत आहे. दरम्यान, सोलापूर शहरासाठी आठ ते नऊ जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे सोलापूर मनपा आयुक्तांच्या मागणीनुसार उजनीतून उद्यापासून (दि. 1 जुलै) 4500 क्युसेकने भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे आवश्यकता भासल्यास हे पाणी सहा हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून कळवण्यात आले आहे. सध्या भीमा नदीच्या प्रवाहात असलेले पाणी पंढरपूरपासून पुढे माचणूर मंगळवेढापर्यंत पोहोचले आहे. आता यातच उद्यापासून सोडण्यात येणाऱया पाण्याची भर पडणार आहे. त्यामुळे सात जुलैपर्यंत टाकळी व औंज बंधाऱयात पुरेसा पाणीसाठा होणार आहे.

12 तासांत उजनीच्या पाणीपातळीत 4 सें.मी.ने वाढ

सध्या उजनी जलाशयात 45 टीएमसी पाणीसाठा असून, टक्केवारी वजा 34.35 टक्के आहे. दि. 26 व 27 जून रोजी दौंड, नगर, भिगवण, इंदापूर परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे 28 जून रोजी सकाळी दौंड येथून दहा हजार क्युसेक्सने पाणी उजनीत येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत अवघ्या 12 तासांत 4 सें.मी.ने वाढ झाली आहे, असेही साळे यांनी सांगितले.