हिंडेनबर्ग ही एक भांडवली बाजारात असलेल्या कंपन्यांची ताळेबंदापासून प्रशासनापर्यंतच्या सर्वच बाबींचे शोधक विश्लेषण करणारी कंपनी आहे. २०१६ पासून त्यांचे विविध कंपन्यांवरचे अहवाल पाहण्यात येतात. ज्या-ज्या कंपन्यांचे मूल्य हे चढे वाटते व ज्यांच्या कारभारात गडबड असण्याचा संशय असतो, अशा काही १०० कंपन्यांचे विश्लेषण करून त्याचा अहवाल ते वेळोवेळी बाजारात आणतात. असा अहवाल सादर करताना ते साधारणपणे ५० आरोपांची सूची सादर करतात. अर्थात, यात पुरावे वगैरे नसतात, तर आकड्यांवरून संशय घ्यायला जागा असते, असेच आरोप असतात. एवढ्या प्रमाणात आरोप केले, की त्यातील काही आरोप कंपनीला कधीकधी चिकटतातसुद्धा आणि हाच त्यांचा उद्देश असतो.


हिंडेनबर्ग हे नावसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. १९३४ मध्ये या नावाचे एक जहाज दुर्घटनाग्रस्त झाले होते. माणसाच्या चुकीमुळे झालेला तो अपघात टाळला जाऊ शकला असता, असा होता. नॅथन अँडरसन या माणसाने हाचधागा पकडत, भांडवली बाजारात अशा अपघातांना आमंत्रण देणाऱ्या कंपन्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पद्धतीने कंपन्यांचे विश्लेषण करायला सुरुवात केली. त्यासाठी आपल्या कंपनीचे नाव ठेवले हिंडेनबर्ग. अर्थात, हे काही त्याने समाजकार्य म्हणून हाती घेतले नव्हते. अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये किंवा रोख्यात 'शॉर्ट सेलिंग' करून त्यातून अमाप फायदा करून घेण्यासाठीच तो हे सर्व करतो. 'शॉर्ट सेलिंग' म्हणजे स्वतःकडे शेअर किंवा रोखे नसताना काही दिवसांच्या बोलीवर असे शेअर किंवा रोखे उधारीवर कर्जात घ्यायचे व ते लगेच विकून टाकायचे. नंतर त्या शेअर किंवा रोख्यांच्या भावात पडझड झाली, की ते विकत घ्यायचे व घेतलेली उधारी परत करायची. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचे शेअर पडणार अशी आपली धारणा असेल, तर ते आज १०० रुपयांना विकायचे. दोन आठवड्यांनी तो भाव ८० रुपयांवर गेला, की शेअर खरेदी करून ज्याच्याकडून उधारीवर घेतले होते, त्याला परत करायचे व २० रुपयांचा नफा खिशात टाकायचा. अर्थात, १०० रुपयांवर व्याजही चुकवावे लागते. ते वजा केले, तरी साधारणपणे १८ रुपये निव्वळ नफा मिळतो.


'शॉर्ट सेलिंग'चे वेगवेगळे प्रकार आहेत. भारतात वायदे बाजारात असे व्यवहार 'ऑप्शन' व 'फ्युचर'मध्ये होतात किंवा दिवसभरात विक्री-खरेदी संपवून खाते शून्यावर आणतात. थोडक्यात, या व्यवहारात नफा मिळवण्यासाठी शेअरचे भाव लवकरात लवकर कोसळणे जरुरीचे असते. यासाठी बाजाराला धक्का देणे गरजचे असते. हिंडेनबर्ग अशाच प्रकारचे अहवाल आणत असते. २०१६ पासून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालांमुळे त्या-त्या कंपन्यांचे शेअर १०-१२ डॉलरवरून अगदी एक डॉलरपर्यंत कोसळले आहेत व त्यात हिंडेनबर्गने अमाप पैसा कमावला आहे. फरक एवढाच,की आजपर्यंत हिंडेनबर्गने लहानसहान कंपन्यांना हात घातला होता. यावेळी मात्र त्यांनी भारतातील अदानी समूहाला हात घातला आहे. अचानक अदानी समूहाची त्यांना कशी आठवण झाली, हे एक गूढच आहे. काही जण यात भारतविरोधी कट सिद्धान्तही मांडत आहेत. हिंडेनबर्गच्या मते मात्र अदानी समूहाचे बाजारमूल्य हे सर्वसाधारण बाजारमूल्यापेक्षा ८५ टक्के अधिक आहे, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांनी अदानी समूहावर काही काळ संशोधनात्मक विश्लेषण केले व त्यावर आधारित हा अहवाल प्रसिद्ध केला. अर्था याचा अपेक्षित परिणाम लगेच दिसून आला. अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअरभाव गडगडून जवळजवळ ८० अब्ज डॉलरनी खाली आले. याचा फायदा हिंडेनबर्ग अथवा इतर कोणा 'शॉर्ट सेलर'ला झाला किंवा नाही हे अजून माहित नाही.