GLOBAL NEWS MARATHI

फोन करून ते मला भेटायला आले. येताना ते त्यांच्या मुलाला घेऊन आले होते. त्यांनी आधी माझी त्यांच्या मुलाशी ओळख करून दिली. मुलगा जसा माझ्यासमोर आला, त्याने मान खाली घातली, डोळे खाली केले. शेकहॅन्ड करताना तो माझ्या डोळ्यात बघत नव्हता.


ते मला म्हणाले, "सर मला तुमच्याशी या मुलाविषयी बोलायचं आहे. " त्यानंतर त्यांनी मुलाला बाहेर बसायला सांगितलं. मुलगाही अज्ञाधारक मुलासारखा उठून बाहेर गेला.


ते गृहस्थ मला म्हणाले, “सर एक अडचण निर्माण झाली आहे. माझा मोठा व्यवसाय आहे. हा माझा मुलगा २६ वर्षांचा झालाय. आम्ही त्याच्या लग्नासाठी स्थळं बघतोय, अनेक मुली बघितल्या. एक खूप चांगली मुलगी समोर आली. आम्हा सर्वांना मुलगी पसंत आहे. मुलीकडच्यांनाही मुलगा पसंत आहे. पण ती मुलगी म्हणते, 'तुमचा मुलगा रुबाबदार नाही.'


मला काय करावं कळेना. रुबाबदार नाही म्हणजे काय ? हेच मला कळलं नाही. पण तिचं हे मत ऐकल्यावर मी या मुलाला घेऊन एका मॉलमध्ये गेलो. ब्रॅन्डेड क्वालिटीचे शूज घेऊन दिले, चांगल्या क्वालिटीचे कपडे घेऊन दिले. त्याला चांगल्या सलूनमध्ये घेऊन गेलो. सगळं झालं. पण एवढे चांगले कपडे घेऊन, त्याला रंगरंगोटी करून तिला काही तो रुबाबदार वाटत नाही.” कपाळावर हात ठेवून ते बोलत होते.


"आता गोरा गोमटा माझा मुलगा, उंची चांगली, नाकी डोळी चांगला. हा त्या मुलीला काही रुबाबदार वाटत नाही! म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो." खूप वेळा इथेच गल्लत होते. प्रत्येकाला वाटतं, मी आणि माझ्या मुलांनीरुबाबदार दिसावं. रुबाबदार दिसणं, व्यक्तिमत्त्व चांगलं असणं म्हणजे फक्त बाहेरची रंगरंगोटी करणं असं होतं का?


या सर्वांमध्ये एकच कारण दडलेलं होतं ते म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. हा आत्मविश्वासाचा अभाव काहींमध्ये असतो आणि काहींमध्ये नसतो.


"हा आत्मविश्वास कुठे मिळतो?"


"असं कुठलं दुकान आहे, जिथे हा आत्मविश्वास मिळेल?"


या सगळ्यांचं उत्तर एकच आहे. आत्मविश्वास हा तुमच्या आतमध्येच मिळतो. हा कुठे बाहेर शोधायला लागत नाही. आपल्या विचारांनीच आत्मविश्वास तयार होतो आणि आपल्या विचारांनीच आपण आत्मविश्वास गमावतो.